नाशिक : ( प्रतिनिधी ) : गेल्या मार्चपासून शाळा कॉलेजांबरोबर जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे क्लासेसही बंद आहेत. शाळाकॉलेजमधील शिक्षकांना नियमित वेतन चालू आहेत परंतु क्लासेस संचालक शिक्षक व त्यांच्या क्लासेसमध्ये शिकवणारे इतर विषय शिक्षक व कर्मचारी यांचे आर्थिकदृष्ट्या भयंकर हाल चालू आहेत. मागीलवर्षी शेवटी न मिळालेली फी, गेल्या सात महिन्यांपासून चालू असलेले भाडे, कर्जाचे हफ्ते, वीज पाणी,मेंटेनन्स, घरपट्टी यांचा खर्च, याशिवाय कुटुंबातील सदस्यांचा वाढलेला घरखर्च आणि त्यात कोणताही आर्थिक स्रोत नसल्याने घरगुती, छोटे व मध्यम क्लासेस महिला व पुरुष संचालकांचे भयंकर हाल होत आहेत. काहींनी अॉनलाईन क्लासेस सुरु केले परंतू त्याला खुपच अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. पालक क्लासची फी भरण्यास उत्सुकही नाही किंवा टाळाटाळ करत आहेत. यासर्व कारणांमुळे मोठ्याप्रमाणात क्लासेस संचालक अडचणीत सापडले आहेत. बेरोजगारीमुळे अनेक सुशिक्षित तरुण तरुणींनी व विधवा, परित्यक्त्या व इतर नोकरी व्यवसाय नसलेल्या शिक्षकांनी क्लासेस सुरु केले. अनेकांच्या क्लासमध्ये विद्यार्थी संख्या बोटावर मोजण्याइतकी असते. त्यावर ते उदरनिर्वाह करतात परंतू सरकारमात्र शाळा कॉलेजला व क्लासेसला एकाच तराजूत मोजत आहे. इतर सर्व व्यवसायांना शासनाने परवानगी दिली आहे. कमी संख्येने विद्यार्थी घेऊन सोशल डिस्टंन्सिंग पाळून मास्क व सॅनिटायझर वापरुन ५ ते १० विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यास शासनाने परवानगी द्यावी अन्यथा या व्यावसायिकांना दरमहा दहा हजार किंवा काही आर्थिक मदत करावी अशी मागणी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने सरकारकडे केली आहे.


प्रतिक्रिया

मार्चपासून सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्व क्लासेस बंद आहेत. १० वी, १२ वीचे अॉनलाईन क्लासेस साधारण मे च्या सुरुवातीपासून सुरू केलेत. जिल्ह्यात छोटेमोठे मिळून जवळपास दोन हजार क्लासेसपैकी ५०० क्लासेस संघटनेत रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी जवळपास ब-याच जणांनी अॉनलाईन क्लासेस सुरु केलेत. मात्र शाळा कॉलेजप्रमाणेच त्याला फारसा चांगला प्रतिसाद नाही. मोबाईल नसने, असले तर रेंज, रिचार्ज, इंटरनेटच्या समस्या, मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर फळ्यावरचे न दिसणे, आवाजाच्या समस्या, अनास्था यामुळे जवळपास ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांपाशी हे अॉनलाईन क्लासेस पोहोचलेले नाही. पालक फी भरत नाहीत. त्यात सिबीएससीने कमी केलेला अभ्यासक्रम, राज्यशासन अभ्यासक्रमाबाबत काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता असल्याने कोणता भाग शिकवायचा व कोणता नाही याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे सर्व असले तरी मार्चपासून काहीही आर्थिक स्रोत नसल्याने क्लासेस संचालकांचे खुप हाल चालू आहेत. सरकारने कमी विद्यार्थी घेऊन, सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून छोट्या व घरगुती क्लासेस घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

  • श्री जयंत मुळे,
    अध्यक्ष,
    नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना, नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *