कायझेन’च्या योग्य अंमलबजावणीद्वारे उत्पादन खर्चात कपात, उत्पादनात व उत्पादनप्रक्रियेत परिणामकारकता साध्य करणे शक्य – श्री. विनोद मानवी, उत्पादन सल्लागार

निमातर्फे आयोजित ‘निमा कायझेन स्पर्धा २०१९’च्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यशाळेत ख्यातनाम उत्पादन सल्लागार श्री. विनोद मानवी यांचे प्रतिपादन; निमातर्फे आयोजित स्पर्धांची केली प्रशंसा
—————————————-
कायझेन म्हणजे सातत्यपूर्ण सुधारणांद्वारे लाभ मिळविणे. कायझेनची उत्पादनक्षेत्रातील अंमलबजावणीनंतर त्याचा उत्पादकता, दर्जा, मूल्य, सुरक्षा, कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे मनोबल या बाबींवर सकारात्मक बदल होतो व त्यातून उत्पादन खर्चात कपात, उत्पादनात व उत्पादनप्रक्रियेत परिणामकारकता साध्य करणे शक्य होते असे प्रतिपादन ख्यातनाम उत्पादन सल्लागार श्री. विनोद मानवी यांनी केले. ते दि. १८ जून २०१९ रोजी निमा हाऊस, सातपूर येथे निमाद्वारे आयोजित “निमा कायझेन स्पर्धा २०१९” च्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. कायझेन कुणी करावे, मूल्यमापन कसे करावे, मूल्यमापनाच्या पद्धती, उत्पादन प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यात करावे याबाबत उपस्थितांना माहिती दिली. कायझेनचे वर्गीकरण स्पष्ट करतांना ९० टक्के कायझेन्स हे सुधारात्मक प्रकारचे कायझेन्स असतात अशी माहिती त्यांनी दिली. तसेच उतपादन सल्लागार म्हणून व्यासायिक वाटचालीत आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

यावेळी व्यासपीठावर निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, निमाच्या दर्जा सुधार समितीच्या अध्यक्षा भाग्यश्री शिर्के, प्रमुख वक्ते विनोद मानवी, निमा इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेल चे समन्वयक श्रीकांत बच्छाव यांची उपस्थिती होती.
उपस्थितांचे स्वागत व वक्त्यांचा परिचय निमाच्या दर्जा सुधार समितीच्या अध्यक्षा भाग्यश्री शिर्के यांनी करून दिला.

निमातर्फे आयोजित होत असलेले विविध उपक्रम व कार्यक्रमांची थोडक्यात माहिती निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी उपस्थितांना दिली. नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक यावी व अस्तित्वात असलेल्या उद्योगांना व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयोजित केलेल्या ‘मेक इन नाशिक’ उपक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. बदलत्या काळानुसार अस्तित्वातील उद्योगांना व्यवसाय वाढीसाठी उत्पादनात व उत्पादनप्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक ठरते. त्यासाठी कायझेन स्पर्धांसारखे उपक्रम महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला.
निमा इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलचे समन्वयक श्रीकांत बच्छाव यांनी आयएफसी द्वारे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. यात प्रामुख्याने वेल्डिंग कार्यशाळा, विद्यार्थ्यांद्वारे सादर करण्यात आलेले कायझेन, विद्यार्थ्यांद्वारे सादर करण्यात आलेले ३० प्रोजेक्ट्स इ. समावेश होता. यातील १५ ते १६ प्रोजेक्ट्स हे इतर कंपन्यांमध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याजोगे उपयुक्त आहेत.

नमुन्यादाखल टीडीके एप्कॉस कंपनीद्वारे श्री. रामेश्वर व सहकाऱ्यांनी कायझेनचे सादरीकरण करण्यात आले.
निमाच्या आयटी व सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर यांनी निमा कायझेन स्पर्धा २०१९ चे नियम, रजिस्ट्रेशन प्रक्रिया व पारितोषिकांचे स्वरूप स्पष्ट केले.
निमा कायझेन स्पर्धांबद्दल माहिती असलेल्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले व स्पर्धांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निमाच्या दर्जा सुधार समितीच्या अध्यक्षा भाग्यश्री शिर्के व निमा जीआयझेड आयएफसी, नाशिक चे समन्वयक परीक्षित जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
निमाचे मानद सचिव सुधाकर देशमुख, कार्यकारिणी सदस्य समीर पटवा, संजय महाजन, उदय खरोटे, नीलिमा पाटील, अखिल राठी, सदस्य मिलिंद राजपूत तसेच सत्तरहून अधिक उद्योजक, व्यावसायिक व निमा सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Random Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*