आपली आवडती मालिका किंवा सिनेमा चालू असताना अचानक ब्रेक लागावा तसी आपली तंद्री भंग पावते ती जाहिरात सुरू झाल्यानंतर. एक अपरिहार्यता म्हणून जाहिरातीकडे पाहिले जाते. नको वाटत असताना सुद्धा अपरिहार्यपणे पहावी लागणारी जाहिरात आपल्याला कधी आवडू लागते हे आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही. ज्याप्रमाणे दहा वेळा खोटे सांगितल्यानंतर ते सुद्धा खरे वाटायला लागते तसे जाहिरातींचे होते. याचा सर्वात जास्त परिणाम होतो तो निर्णय न घेता येणाऱ्या, चांगले किंवा वाईट हे पटकन न समजू शकणाऱ्या लहान मुलांवर आणि त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांवरती. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकते ते म्हणजे जाहिरातीमध्ये मुलांचा वापर आणि मुलांना उद्देशून जाहिरात.
वरवर पाहता दोन्ही वर्ग सारखे वाटतात मात्र त्यामध्ये जाहिरातींचे उद्देश वेगळे आहेत. जाहिरातीमध्ये मुलांचा वापर हा पालकांना उद्देशून (targeting ) असतो व त्याद्वारे जर आपण आपल्या मुलांवर प्रेम करत असाल तर ते उत्पादन खरेदी कराल. इथपर्यंत ठीक परंतु ही अपील जेव्हा अविश्वासाची (Insecurity Feeling ) भावना तयार करते तेव्हा ती अधिक धोकादायक ठरते. उदाहरणार्थ “5 साल तक बच्चो के दिमाग का आधा विकास हो जाता है तो आप आपके बच्चो के लिए क्या कर रहे हो” हे हेल्थ ड्रिंक मध्ये होणारा मुलांचा वापर हा आई-वडिलांना इमोशनल अपील साठी केलेला असतो. याचा मुख्य दुष्परिणाम म्हणजे ग्राहक यावेळी उत्पादनाची गुणवत्ता, किंमत याकडे दुर्लक्ष करून उत्पादन खरेदी करतो. तसेच या पासून मिळणारा रिझलट्ट जाहिराती प्रमाणे नसल्यास हा उत्पादनाविषयी दुप्पट चीड निर्माण करणारा असतो.
तसेच दुसरा प्रकार म्हणजे मुलांना उद्देशून केलेल्या जाहिरातीत फँटसी, अनाकलनीय दाखविलेले असते. एका नवीन संशोधनानुसार लहान मुले वस्तूची उत्पादनाची खरेदी प्रक्रिया यात मोलाचा हातभार लावताना दिसतात. खरेदी प्रक्रियेत निर्णयाची सुरुवात(Initiator), माहितीचे संकलन(Information Gathering ), अंतिम निर्णय (Final Decision) यामध्ये मुले मोलाची भूमिका बजावताना दिसतात.


त्यामुळे जाहिरातींचा मुख्य उद्देश त्यांना उत्पादनाची खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणे हा असतो. परंतु याचे अनेक दुष्परिणाम आहेत. जसे उत्पादन खरेदी केल्यानंतर ती अपेक्षा पूर्ती न करू शकल्यास येणारा उद्वेग मुलांमध्ये जास्त असतो. उत्पादनाची गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारे न पाहता ती फक्त इमोशनल अपील वर विसंबून वस्तू खरेदी करण्याचा हट्ट धरतात, ती अंधानुकरण करतात, तसेच जाहिरात दाखवल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे दोन्ही प्रकारच्या जाहिरातींमध्ये ग्राहकांची निर्णय घेतांना ग्राहकांनी तर्कशुद्ध पणे विचार करून निर्णय घ्यायला हवेत तसेच मुलांना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेऊन अंतिम निर्णय स्वतः घेतला पाहिजे व मुलांना जाहिराती मागील फोलपणा समजून सांगितला पाहिजे. याप्रकारे आपण मुलांचे मन सांभाळूनही योग्य वस्तू खरेदी करू शकुन खरेदीचा आनंद द्विगुणित करू शकतो.

निलेश पवार
भोंसला मिलिटरी कॉलेज,
रामभूमी, नाशिक