विदेश व्यापार धोरण व आयात निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विदेश व्यापार संचालनालय (डिजीएफटी) ची आहे. कार्यक्रमाचा उद्देश नाशिक जिल्हा हा एक्स्पोर्ट हब म्हणून विकसित करण्यासाठी येथील निर्यात क्षमता असलेली उत्पादने शोधून त्यांच्या निर्यातीसाठी संबंधित उत्पादक व निर्यातदारांस निर्यातीस प्रोत्साहित करणे व त्यांच्या अडचणी जाणून घेणे हा आहे व यात डीजीएफटी समन्वयक म्हणून भूमिका बजावते. निर्यातदारांना निर्यात प्रक्रिया सुरळीत पार पडत यावी यासाठी डीजीएफटी वचनबद्ध असल्याचा विश्वास डीजीएफटीचे जॉईंट डायरेक्टर श्री. एच. डी. लोकेश यांनी दिला. ते ते निमात डीजीएफटी पुणे तर्फे दि. ७ नोव्हेंबर रोजी निमा आयोजित आऊटरिच प्रोग्रॅममध्ये बोलत होते. विदेश व्यापार धोरण व आयात निर्यात धोरणातील महत्वाच्या तरतुदी, विदेश व्यापार धोरण २०१५-२० यातील एमईआयएस व एसईआयएस योजना, डिफेन्स व हाय-टेक उत्पादनांच्या निर्यातीस चालना देणाऱ्या तरतुदींची माहिती त्यांनी यावेळी पॉवरपॉईंट प्रेसेंटेशनद्वारे उपस्थितांना दिली. व्यापार सुलभीकरण व इज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनांवर भर देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी व्यासपीठावर निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, डीजीएफटीचे जॉईंट डायरेक्टर श्री. एच. डी. लोकेश, असिस्टंट डीजीएफटी श्री.प्रेमचंद्रन नायर, जिल्हा उद्योग केंद्र नाशिकचे महाव्यवस्थापक सतीश भामरे, व्यवस्थापिका सौ सीमा पवार यांची उपस्थिती होती.
निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी आयोजित प्रश्नोत्तर सत्रात उपस्थित उद्योजक व निर्यातदारांच्या प्रश्न व शंकांचे निरसन वरील मान्यवरांनी केले.
यावेळी निमाचे मानद सचिव सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर,निमा दिंडोरीचे अतिरिक्त उपाध्यक्ष संजय सोनवणे, कार्यकारिणी सदस्य प्रदीप पेशकार, संजय महाजन, एन. डी. ठाकरे, महेश दबक, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल दवंगे तसेच उद्योजक व निर्यातदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.